इंदापूर: पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या (Ujani Dam) विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रावर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात परदेशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्षांचे (Migratory Birds) आगमन होते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि धरणातील उच्च पाणी पातळीमुळे हे विदेशी पाहुणे, विशेषतः नजाकतदार 'रोहित' अर्थात फ्लेमिंगो (Flamingo) पक्षी, उशिरा येण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी थंडीची चाहूल लागताच मध्य आशिया, सैबेरिया, केनिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या दूरच्या प्रदेशांतून लाखो पक्षी उजनीच्या जलाशयाला भेट देतात. या पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो (रोहित), पट्टकादंब (Bar-headed Goose), चित्रबलाक (Painted Stork) यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश असतो. पक्षी निरीक्षकांसाठी आणि पर्यटकांसाठी हा काळ एक मोठी पर्वणी असतो.

0 Comments